जालना पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी नेण्यात येणारी २८ गोवंशीय जनावरे पकडली, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!
सदर बाजार डीबी पथकाची धडक कार्यवाही; दोन आरोपीत जेरबंद, एक फरार

जालना पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी नेण्यात येणारी २८ गोवंशीय जनावरे पकडली, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!
सदर बाजार डीबी पथकाची धडक कार्यवाही; दोन आरोपीत जेरबंद, एक फरार
जालना, दि. १७/०६/२०२५: जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलिसांनी कत्तलीसाठी जाणारी २८ गोवंशीय जनावरे आणि एक कंटेनर असा सुमारे ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केली आहे. ही कारवाई १६ जून २०२५ रोजी रात्री उशिरा करण्यात आली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे जनावरांची क्रूरतेने होणारी वाहतूक थांबवण्यात यश आले आहे.
असा घडला थरार:
पोलीस ठाणे सदर बाजारच्या डीबी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, भोकरदनकडून एक बंद कंटेनर (क्र. MH 04 LQ 8802) गोवंशीय बैल घेऊन जालनामार्गे जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोहेकॉ १२६७ जाधव, पोकॉ १५१९ तेजनकर आणि चालक कल्पेश पाटील यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली.
पोलीस निरीक्षक श्री. भारती, डीबी पथक प्रमुख शैलेश म्हस्के आणि पोहेकॉ ५९३ रंगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कन्हैयानगर चौफुली येथे सापळा रचला. वरील वर्णनाचा कंटेनर येताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालकाने कंटेनर न थांबवता छत्रपती संभाजीनगर रस्त्याकडे वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून टोलनाका येथे कंटेनरला ताब्यात घेतले.
क्रूरतेचा कळस!
दोन पंचांसमक्ष कंटेनरची तपासणी केली असता, त्यात अत्यंत दाटीवाटीने, श्वास घेण्यास त्रास होईल अशा निर्दयीपणे २८ गोवंशीय बैल भरलेले आढळले. ही जनावरे त्याच ठिकाणी उतरवणे योग्य नसल्याने, पोलिसांनी कंटेनर थेट मंठा रोडवरील राममूर्ती येथील श्री गुरुगणेस गोशाळा येथे नेला. तेथे पुन्हा पंचांसमक्ष सर्व बैल खाली उतरवण्यात आले.
४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन अटकेत:
या कारवाईत पोलिसांनी २८ बैल आणि कंटेनर असा एकूण ४८,९९,०००/- (अठ्ठेचाळीस लाख, नव्यान्नव हजार) रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. कंटेनर चालक शेख सलीम शेख सुलतान (वय २५, रा. अब्दुलशहा नगर, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि त्याचा साथीदार शेख अमिन शेख बशीर (वय २२, रा. अब्दुलशहा नगर, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, एक इसम शेख मुज्जु शेख अय्युब (रा. अब्दुलशहा नगर, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
कत्तलीसाठी जात होती जनावरे:
आरोपीतांनी चौकशीदरम्यान सांगितले की, सदर माल सोयगावदेवी येथील गजानन राऊत (ता. भोकरदन) आणि सिल्लोड येथील शेख साजित शेख लुकमान (रा. अब्दुलशहा नगर, सिल्लोड) यांचा असून, तो कत्तलीसाठी जाम, जिल्हा लातूर येथे घेऊन जात होते.
याप्रकरणी पोलीस ठाणे सदर बाजार, जालना येथे गुरनं ५०८/२०२५ कलम २८१, ३ (५) भा.दं.वि. सह कलम ५(अ), ५(ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारणा अधिनियम २०१५) सह कलम ११(१)(D)(E)(I)(F) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ ९३ भरत लक्ष्मणराव आगळे हे करत आहेत.
यशस्वी कामगिरीचे श्रेय:
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि सपोनि श्री. साबळे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के, पोहेकॉ/१२६७ जगन्नाथ जाधव, पोहेकॉ/५९३ रामप्रसाद रंगे, पोहेकॉ/१३९३ पटेल, पोकॉ/१५१९ गणेस तेजनकर, पोकॉ/२३० अजिम शेख, पोकॉ/१४४६ राहुल कटकम, पोकॉ/१६९८ लोढे, पोकॉ/९६३ दुर्गेश गोफणे, चालक पोकॉ/९९६ कल्पेश पाटील, चालक ग्रे पोउपनि श्री. हिवाळे यांनी केली.