जालना पोलिसांचे धडक ऑपरेशन, ९३,५०० चा मुद्देमाल जप्त करत घरफोड्या करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या!
फरार चोरट्यांना अखेर अटक: जालना स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

जालना पोलिसांचे धडक ऑपरेशन, ९३,५०० चा मुद्देमाल जप्त करत घरफोड्या करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या!
जालना, शुक्रवार, ०६ जून २०२५: जालना जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी कंबर कसलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने तीन सराईत चोरट्यांना जेरबंद करत तब्बल ९३,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने शहरात वाढलेल्या चोरीच्या घटनांना ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष मोहीम आणि गुप्त माहिती
जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी चोरी आणि घरफोडी करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना दिले होते. त्यानुसार, श्री जाधव यांनी आपल्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या गुन्हेगारांचा शोध घेण्याचे निर्देश दिले.
दिनांक ०५/०६/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वृंदावन गार्डनच्या पाठीमागे, नुतन वसाहत येथे झालेल्या घरफोडीमागे सराईत आरोपीत अक्षय राजू शर्मा आणि त्याचे साथीदार असल्याचं समजलं.
आरोपीत जेरबंद, मुद्देमाल हस्तगत
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अक्षय राजू शर्मा (वय २४, रा. रेल्वे ब्रिजखाली, नुतनवसाहत, जालना), अविनाश उर्फ भैय्या रामभाऊ शेंडगे (वय २५, रा. पवळाचीवाडी, ता. गेवराई, जि. बीड) आणि संदेश उर्फ चिंग्या गणेश खडके (वय १९, रा. भरतनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) या तिघांना ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान, या आरोपीतांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे आणि देवाचे ५३,५०० रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. याव्यतिरिक्त, आरोपी अविनाश शेंडगे याच्याकडून ४०,००० रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉपही आढळला. या लॅपटॉपच्या मालकीहक्काबाबत समाधानकारक पुरावे न दिल्याने तो चोरीचा असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे.
फरार आरोपीतांना पकडण्यात यश
विशेष म्हणजे, यातील आरोपीत संदेश उर्फ चिंग्या गणेश खडके हा पुंडलिकनगर पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आणि अंबड पोलीस ठाणे, जालना येथे घरफोडीच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मागील एक महिन्यापासून फरार होता. तसेच, आरोपीत अविनाश उर्फ भैय्या रामभाऊ शेंडगे हा तालुका पोलीस ठाणे, जालना येथे घरफोडीच्या गुन्ह्यात (गु.र.क्र. २०/२०२५ कलम ३३१(४), ३०५,३३३ भा.न्या.सं.) मागील चार महिन्यांपासून फरार होता. या दोघांना पकडल्यामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यशस्वी कारवाई करणारे पथक
ही कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, संभाजी तनपुरे, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, सचिन राऊत, अशोक जाधवर (सर्व स्थानिक गुन्हे शाखा) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.