जालन्यात 21 मे रोजी भव्य रोजगार मेळावा; जागेवरच मिळणार नोकरीची संधी!
By तेजराव दांडगे

जालन्यात 21 मे रोजी भव्य रोजगार मेळावा; जागेवरच मिळणार नोकरीची संधी!
जालना, दि. 16: नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या वतीने बुधवार, दिनांक 21 मे, 2025 रोजी “प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधी” चे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मॉडेल करिअर सेंटर येथे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पार पडणार आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये नामांकित खासगी कंपन्या सहभागी होणार असून, त्याद्वारे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. पुणे येथील टी.व्ही.एस. सप्लाय चैन सोल्युशन्स प्रा. लि. कंपनी दहावी, बारावी, आयटीआय/पदवीधर (बी.ए, बी.कॉम, बी.एसी) उत्तीर्ण उमेदवारांसाठी फ्लोअर स्टाफच्या तब्बल 50 जागा आणि कोपा, आयटीआय / MS-CIT कॉम्पुटर ऑपरेटर उत्तीर्ण उमेदवारांसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या 10 जागा भरणार आहे. यासोबतच, डिझेल मेकॅनिकॅल, ट्रॅक्टर मेकॅनिकॅल, मोटार मेकॅनिकॅल उत्तीर्ण उमेदवारांसाठी टो ऑपरेटरच्या 50 जागा उपलब्ध आहेत.
याव्यतिरिक्त, जालना येथील अन्नपूर्णा फायनान्स प्रा. लि. कंपनी दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी फील्ड क्रेडिट एक्झिक्युटिव्हच्या 20 जागा आणि कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या 20 जागांची भरती करणार आहे. म्हणजेच, एकूण 120 रिक्त पदांसाठी या ड्राईव्हमध्ये निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या सुवर्णसंधीचा लाभ घेता येणार आहे. त्यांची थेट मुलाखत घेऊन जागेवरच निवड केली जाणार आहे.
जालनातील इच्छुक युवक-युवतींना या संधीचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, केंद्र सरकारच्या एन.सी.एस. पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी www.ncs.gov.in या वेबसाईटवर आपली नोंदणी करावी. ज्या उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केली नसेल, त्यांनी प्रथम नोंदणी करून होम पेजवरील जॉब सीकर (Job Seeker) लॉगिनमधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडावा आणि त्यातील [PLECEMENT DRIVE 1 (2025-26) JALNA] याची निवड करावी.
उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घेऊन, आवश्यक किमान पात्रता तपासून घ्यावी. त्यानंतर उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा. मुलाखतीसाठी येताना किमान दोन प्रतीत बायोडाटा, फोटो आणि शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या छायाप्रती सोबत ठेवाव्यात.
तरी, जालना जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 21 मे, 2025, बुधवार रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय जालना 431203 येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी केले आहे.