पुणे : टँकर लॉबीकडून रोज हजार टँकर पाणी पुरवठा केला जात आहे. या टँकरचे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, ते पाणी कुठून भरतात, त्यांच्या पाण्याचा स्रोत काय याची कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासोबत महापालिकात खेळ होत आहेच, पण महापालिकेच्या वॉल्व्हमॅनला हाताशी धरून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून टँकरलॉबीचे खिसे भरण्याचे उद्योग सुरु आहेत. यामुळेच नागरिक हवालदिल झाले आहेत.
पुणे शहर, उपनगरांमध्ये पाणी टंचाईच्या समस्या असल्याने नागरिक हैराण आहेत. खडकवासला धरणातून दरवर्षी २२ टीएमसी पाणी पुण्यासाठी वापरले जात आहे. तरीही अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. जुन्या हद्दीत हे प्रश्न आहेतच, पण शहरात समाविष्ट झालेल्या ३२ गावांच्या नव्या हद्दीत पाणी पुरवठ्याची यंत्रणाच नसल्याने हा बहुतांश भाग टँकरवर अवलंबून आहे.
या गावांमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) बांधकामांना परवानगी दिली जाते. पाणी पुरवठ्याबाबत महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणल्याशिवाय बांधकाम परवानगी दिली जाणार नाही असा निर्णय जुलै घेतला होता. पण समाविष्ट गावात पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे असे सांगत एका महिन्यात पीएमआरडीएने घुमजाव करत हा आदेश मागे घेतला.
त्यामुळे पाणी नसतानाही सदनिका विकल्या जात आहेत, बिल्डरकडून नागरिकांना टँकर पुरविण्याचे आश्वासन दिले जाते, पण एकदा बांधकाम संपले की रहिवाशांना तुमच्या पाण्याची व्यवस्था तुम्ही करा असे सांगून त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. त्यामुळे या गावांमध्ये सोसायट्यांना पाण्यासाठी टँकरवर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे.
शहराच्या जुन्या हद्दीतही खासगी टँकर चालकांचा व्यवसाय प्रचंड तेजीत आहे. जास्त पैसे देऊनही टँकरसाठी काही तास वाट पाहावी लागते अशी स्थिती आहे. पण हे खासगी टँकरवाले कुठून पाणी भरतात. महापालिकेच्या टँकर भरणा केंद्राऐवजी शहरात खासगी टँकर भरणा केंद्र किती आहेत?, कोणत्या भागात आहेत? त्यात बोअर किती, विहिरी किती याची कोणतीही माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे नाही.
कृत्रिम पाणी टंचाई
शहराच्या जुन्या हद्दीत पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकानुसार पाणी सोडण्यासाठी, वॉल्व्ह फिरविण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. पाणी पुरवठा पूर्ण दाबाने करायचा की दबाने हे ठरवतात, त्यानुसार वेळ कमी जास्त करतात. अनेक नागरिकांना पाणी कमी का आले, पाणी लवकर का गेले हे कळत नाही. त्यामुळे सोसायट्यांना नाइलाजास्तव टँकर मागवावे लागत आहेत.
खासगी टँकरचालक आणि वॉल्व्ह फिरविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मितलीभग असल्याने टँकर लॉबी मुजोर झाली आहे. पाणी कमी सोडले जात असल्याची तक्रार केल्यानंतर काही दिवस व्यवस्थित पाणी दिले जाते. त्यानंतर पुन्हा कमी पाणी सोडण्यात येते. या कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण आहेत. तर ज्या सोसायट्या, नागरिक वॉल्व्ह मॅनला पैसे देतात त्यांना व्यवस्थित पाणी दिले जाते, यास पाणी पुरवठ्यातील काही अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
टाक्या दिसतात पण पाणी नाही
पुणे महापालिकेने समान पाणी पुरवठा योजनेतून ८२ पैकी ५१ टाक्यांचे बांधकाम पूर्ण करून रंगरंगोटी केलेली आहे. तर १९ टाक्यांची कामे सुरु आहेत. ज्या भागात या टाक्या बांधल्या आहेत, तेथे बांधकाम व्यावसायिकांकडून या भागात या टाक्यांमधून २४ तास पाणी पुरवठा होणार आहे असे सांगितले जाते.
त्यामुळे त्यावर नागरिक विश्वास ठेवून घर विकत घेतात. पण या टाक्या बांधलेल्या असल्या तरी त्यांना जलवाहिनी जोडण्याचे काम दोन वर्षापासून अर्धवट ठेवण्यात आले आहे. हे काम पूर्ण केले जात नसल्याने त्यातून पाणी पुरवठा होत नाही. उलट नागरिकांना टँकरसाठी महिन्याला लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??