जालन्यात निवडणुकीपूर्वी गुन्हेगारांना ‘अंतिम इशारा’: भोकरदन उपविभागात १०५ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई!
By तेजराव दांडगे

जालन्यात निवडणुकीपूर्वी गुन्हेगारांना ‘अंतिम इशारा’: भोकरदन उपविभागात १०५ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई!
भोकरदन (जालना) – आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जालन्याचे पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिनांक २४/११/२०२५, सोमवार रोजी भोकरदन येथे महत्त्वपूर्ण कारवाई केली.
भोकरदन उपविभागातील गंभीर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १०५ आरोपींवर प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला होता.
कारवाईची उद्दिष्ट्ये आणि आरोपींचे स्वरूप:
हा कॅम्प प्रामुख्याने खालील प्रकारच्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करून आयोजित करण्यात आला होता:
१) ज्यांच्यावर दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
२) जेलमधून सुटलेले (जेल रिलीज) गुन्ह्यांतील आरोपी.
३) शरीराविरुद्ध (मारामारी, गंभीर दुखापत) आणि मालाविरुद्ध (चोरी, लूट) गुन्हे करणारे आरोपी.
पोलीस ठाणेनिहाय प्रतिबंधात्मक कार्यवाही:
या कॅम्पमध्ये उपविभागातील भोकरदन, जाफ्राबाद, हसनाबाद, टेभुर्णी आणि पारध पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावर असलेल्या एकूण १०५ आरोपींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ नुसार प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली.
अप्पर पोलीस अधीक्षकांकडून कडक सूचना:
या सर्व आरोपींकडून बंधपत्र (Bond) घेण्यात आले आहे. बंधपत्राचे उल्लंघन झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सक्त सूचना मा. अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी यावेळी दिल्या.
सदर कार्यवाही यशस्वी करण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी किरण बिडवे (भोकरदन), पोनि सतिष जाधव (जाफ्राबाद), सपोनि संजय अहिरे (हसनाबाद), सपोनि संतोष माने (पारध), सपोनि कैलास भारती (टेभुर्णी) व पोलीस अंमलदार हजर होते.





