अमळनेर मतदार संघातील प्रश्नांबाबत आ शिरीष चौधरी नियोजन समितीच्या बैठकीत झाले आक्रमक..
मतदार संघ दुष्काळी जाहीर करण्याची केली मागणी
अमळनेर(प्रतिनिधी )जळगाव जिल्हा नियोजन विकास समितीची सभां नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली.सदर बैठकीत आमदार शिरीष चौधरी यांनी अमळनेर मतदारसंघातील विविध समस्याबाबत आक्रमकपणे भूमिका मांडत अमळनेर मतदार संघात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
या सभेत आ चौधरींनी गिरणा धरणावरून भोकरबारी धरणात पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली.तसेच अमळनेर मतदार संघात कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांची असलेली वर्तमान स्थिती मांडून मतदार संघ हा दुष्काळग्रस्त घोषित व्हावा, अशी मागणी करत मतदार संघाची आणेवारी 50 पैसेच्या आत लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन प्रत्यक्ष चर्चा केली.तसेच अक्कलपाडा धरणात पाणी आरक्षित व्हावे म्हणून जिल्हाधिकारी धुळे यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार झाला असून जळगाव जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.व शेवटी वंचित शेतकरयाना पीक विमा मोबदला प्राप्त झाला असला तरी प्रत्यक्ष पैसे मात्र दिले गेले नाहीत तरी लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा करावे,व सबंधित कंपनीचे अधिकारी यांच्या सोबत मिटिंग आयोजित करावी,तसेच इजिमा व ग्रामिण मार्गे यांच्या दर्जा उन्नती करून प्रजिमा कराव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली.